Rishikesh Vighne | रेडी रेकनर प्रमाणे शेतीकर्ज द्या कालिदास आपेट यांची मागणीरेडी रेकनर प्रमाणे शेतीकर्ज द्या कालिदास आपेट यांची मागणी


रेडी रेकनर प्रमाणे शेतीकर्ज द्या कालिदास आपेट यांची मागणी

by Kalidas apet
(अंबाजोगाई )रासायनिक खते, बियाणे,किटकनाशक,शालेय साहित्य-फीस,ट्युशन फीस,कपडे आणि शेतमजुरीच्या वाढत्या किंमती लक्षात घेता सन 2016-17 च्या खरिप हंगामापासुन राज्यस्तरिय बॅकर्स कमिटीने पीकावर कर्ज देण्याची पध्दत तातडीने बदलून 'रेडी रेकनर' प्रमाणे शेतीकर्ज द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली.
अपुऱ्या भांडवलामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीत योग्यवेळी पुरेसे पैसे उपलब्ध होत नाहीत.त्याचा शेतीच्या उत्पादकतेवर गंभिर परिणाम होतो. कोट्यावधी रुपये जमिनीची किंमत असतानाही किरकोळ पैशासाठी बॅकेकडे हात पसरावे लागतात.खाजगी सावकारांना विश्वासू बैनामे करुन दिल्यानंतरही पुरेशा भांडवलाची व्यवस्था होत नाही.
डबघाईस आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅका,सेवा सहकारी सोसायट्या आणि मुजोर राष्ट्रीयीकृत,ग्रामीण, खाजगी बॅंका शेतकऱ्यांना पावलोपावली अपमानित करतात. मागिल वर्षीच्या कर्जरकमेत 10% वाढ करण्याने शेतीच्या पुर्वमशागतीपासून काढणीपर्यंतची कामे होवू शकत नाहीत.शेतकऱ्यांऐवजी बॅकानाच यामुळे मदत होते.
या परिस्थितीचा गांभिर्याने विचार करुन सोनेतारण कर्जाप्रमाणे जमिनिच्या रेडिरेकनर एवढी पतमर्यादा गृहित धरुन त्याच्या 90% शेती कर्जवाटपाचे धोरण राज्यस्तरिय बॅकर्स कमिटीने राज्यभरात राबवावे. एकाही शेतकऱ्याला खाजगी सावकाराच्या दारी पेरणीसाठी जाण्याची गरज पडू नये अशी खंबीर भुमिका राज्यसरकारने घ्यावी अशी शेतकरी संघटनेने आग्रही मागणी केली आहे.